अंदरसूल : जप्ती वॉरंट, नळजोडणी खंडित करण्याच्या आदेशाला भीक न घालणाऱ्या बहुतांश मालमत्तधारकांनी शुक्रवारी, शनिवारी व रविवारी घरपट्टी-पाणीपट्टी कर भरल्याने ग्रामपालिकेच्या खात्यात सुमारे दोन लाख रुपये कराच्या जमा झाल्याचे सरपंच विनिता सोनवणे यांनी सांगितले.तसेच येथील विज वितरण महामंडळाच्या थकीत बिलांसह तब्बल अडीच लाख रु पये जमा झाल्याचे वीज वितरण मंडळाकडून सांगण्यात आले. केंद्रशासनाने एकाएकी चलनातील पाचशे व एक हजराच्या नोटा बंद करून नवीन चलन लागू केले. त्यामुळे जुन्या नोटा असलेल्यांची चांगलीच फजिती झाली. याचाच फायदा घेत ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात येत्या दोन दिवसांत मालमत्ताधारकांनी कर भरल्यास पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील अशी दवंडी दिली होती. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी चलनातून बाद झालेल्या नोटांनी कर भरत ग्रामपालिकेला सहकार्य केले. दरम्यान येथे असलेल्या बँक आॅफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक सुभाष अहिरे यांनी ग्रामपंचायतीला यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीला मिळाला दोन लाखांचा कर
By admin | Updated: November 15, 2016 01:38 IST