नाशिक : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज (दि. १०) साजरा होत असून, दुपारपर्यंत भद्रा काळ असल्याने या काळात रक्षाबंधन साजरे करू नये, असे सांगितले जात आहे. रविवारी सकाळपासून ते दुपारपर्यंतचा काळ शुभ कार्यासाठी वर्ज्य आहे. भद्रा वर्ज्य करून रक्षाबंधन करावे, असे धर्मसिंधूत आहे. उद्याचा (रविवार) भद्रा काळ दुपारी १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत आहे. म्हणजेच त्यानंतर प्रदोषकाळी रात्री ११ वाजून ३८ मिनिटांपर्यंत रक्षाबंधन अतिशुभ आहे. दुपारी ३ ते ४.३० गुलीक काळ शुभ आहे. उद्याचा राहू काळ दुपारी ४.३० ते ६ या वेळेत असून, हा काळ फक्त प्रयाण प्रवास, नवीन व्यवहार या कार्यांसाठी महत्त्वाच्या गाठीभेटी वर्ज्य आहे. त्या काळात रक्षाबंधन केले तरी चालेल, अशी माहिती वेद अभ्यासक रत्नाकर संत यांनी दिली. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहरातील राख्यांची दुकाने गजबजून गेली होती. (प्रतिनिधी)