नाशिक : जगाच्या पाठीवरून नष्ट होत चाललेली निसर्गाची गिधाड प्रजातीच्या संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील खोरीपाडा येथे आदिवासी ग्रामस्थ व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या राबविल्या जाणाऱ्या ‘गिधाड रेस्तरां’ प्रकल्पाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला.मुंबई येथील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राज्य शासनाच्या वतीने जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारच्या वाघ बचाव मोहिमेचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीत व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बच्चन यांनी खोरीपाडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे, सेवानिवृत्त वनपाल काशीनाथ वाघेरे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, गोपाल शेट्टी, प्रकाश सुर्वे, वल्सा नायर-सिंह, मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, वन्यजीवन मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत आदि मान्यवर उपस्थित होते. दुर्मीळ होत चाललेल्या वन्यजीव प्रजाती गिधाडांच्या संवर्धनासाठी उत्कृष्टरीत्या लोकसहभागातून केलेले कार्य आणि गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत खोरीपाड्याचे शिंदे व तत्कालीन वनपाल वाघेरे यांना विशेष प्रमाणित करण्यात आल्याची माहिती पश्चिम वनविभागाच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
शासनाकडून ‘नाशिक गिधाड रेस्तरां’चा गौरव
By admin | Updated: October 9, 2015 22:29 IST