नाशिक : ‘तुझ्या मैत्रीविना आयुष्य धूसर, तुझी मैत्री प्रेमाचा अविरत पाझर’ अशा शब्दांमधून मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारा मैत्र दिन रविवारी (दि.६) अमाप उत्साहात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली आहे. मैत्र दिन रविवारी आल्याने अनायासे सुटी मिळाली असून, मित्र-मैत्रिणींनी हा दिवस यादगार बनवावा, या हेतूने कुणी छोटीशी पार्टी, कुणी लहान- मोठी पिकनिक, कुणी एखादा सिनेमा, नाटक तर कुणी फक्त एकत्र जमून मनसोक्त गप्पा मारण्याचे बेत ठरवले आहे. रविवार असल्याने आणि श्रावणात हिरवाईचे अनोखे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी सोमेश्वर, गंगापूर डॅम, त्र्यंबकेश्वर, पहिने, जव्हाररोड, इगतपुरी आदी ठिकाणी छोटीशी ट्रीप करण्याचे नियोजन केले आहे. तर काही जणांनी एकत्र जमून हिंदी, मराठी चित्रपट पहाण्याचे नियोजनकेलेआहे.आपल्या जीवलग मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी वैविध्यपूर्ण वस्तूंचीही खरेदी करण्यात आली असून, मैत्रीचा धागा असणारा फ्रेंडशिप बॅँड बांधून, गिफ्ट देऊन मैत्र दिवस साजरा केला जाणार आहे. मैत्र दिनानिमित्त रविवार पेठ, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, सिडको, नाशिकरोड आदी सर्व ठिकाणच्या दुकानांमध्ये भेटवस्तू, बॅँड यांचे प्रकार पहायला मिळत आहे. फ्रेंडशिप बॅँडमध्ये यंदा वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात दाखल झाले असून लेदर, सॅटन, बीट्स, कॉटन आणि वूलनमधील आकर्षक बॅँड्सना तरुणाईची पसंती लाभत आहे. पारंपरिक टेडीबिअर, डॉगी, डॉल अशा सॉफ्ट टॉईज यांबरोबरच पर्सनलाज्ड किचेन्स, मग, मोबाइल कव्हर, ब्रेसलेट, घड्याळ, चेन, शोभेच्या वस्तू, टीशर्ट, ज्वेलरी आदी तºहेतºहेच्या वस्तू आपापल्या मित्र-मैत्रिणींना देण्याचे अनेकांनी ठरविले असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याची खरेदी करण्याची लगबग बाजारपेठेत दिसून आली. मैत्र दिनानिमित्त सोशल मीडियावरही संदेश, इमेज यांचा पाऊसच पडलेला दिसून येत आहे. मित्र-मैत्रिणींना निरनिराळ्या माध्यमातून शुभेच्छा देत मैत्रीचे नाते घट्ट करण्यावर भर दिला जाणार आहे.