घोटी : इगतपुरी तालुका सर्वाधिक धरणाचा तालुका. सहा मोठ्या क्षमतेची व अनेक लहान-मोठे बांध-बंधाऱ्यांसह शेततळेही आहेत. सर्वाधिक पाऊस तालुक्यात होत असल्याने पावसाळ्यात भरून वाहतात. परंतु या पाण्याचे नियोजन नसल्याने दर उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, सर्वात जुन्या दारणा, वैतरणा, कडवा यासह मुकणे धरणात गाळाचे प्रमाण वाढत असल्याने साठ्यात कमालीची घट होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दारणा धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा सुमारे दीड टीएमसी पाण्याची क्षमता कमी झाली असल्याचे समजते.पंधरा वर्षापासून रखडले कामतालुक्यात खापरी नदीवर वाकी खापरी व भाम नदीवर भाम या दोन धरणांची कामे रखडली आहेत. यातील वाकी खापरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याने धरणाच्या कामाला विरोध दर्शविला आहे. धरणासाठी संपादित केलेल्या भावली, कोरपगाव, पिंपळगाव भटाटा, वाळविहीर, धार्नोली या गावांचे पुनर्वसनाचे कोणतेही काम गेली दहा वर्षांत करण्यात आले नाही. वाळविहीर येथील लोहारवाडीतील ग्रामस्थांनी स्वेच्छा पुनर्वसनाची तयारी दाखवूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी घोटी वैतरणा रस्त्यावर कोरपगावजवळ पुनर्वसनाची मॉडेल प्रतिकृती दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती.या ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीची वापराअभावी दुरवस्था झाली असताना शासन याच प्रतिकृतीच्या भरवशावर चारही गावांचे पुनर्वसन झाले असे जाहीर करते. दरम्यान, राज्य सरकारात फेरबदल झाल्याने धरणाच्या निधीसाठी मंजूर झालेला वाढीव निधी रखडल्याने वाकी खापरी धरणाला अजून दोन वर्ष पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विस्थापित गावाच्या संपादित जमिनीचा मोबदला मिळणे बाकी आहे. तसेच बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्याला शिंदेवाडी ते वाळविहीर गावठा असा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून, पावसात अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत धरणाचे काम चालू होऊ देणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्त घेत आहेत. अशीच अवस्था भाम धरणाची असून, भाम धरण्ग्रस्तांचे ही अद्याप कोणतेही पुनर्वसन झालेले नाही. (वार्ताहर)
घोटी : नियोजन नसल्याने दर उन्हाळ्यात टंचाई
By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST