नाशिक : गुरू हे आपल्याविषयी आपल्यापेक्षा अधिक जाणत असतात. ते लोहचुंबकासारखे असतात. शिष्य लोखंडाप्रमाणे गुरुकडे आपोआप आकर्षिले जातात; मात्र त्यासाठी आधी मनावरचा गंज काढावा लागतो. हा गंज साधनेद्वारेच दूर होऊ शकतो, असा संदेश आध्यात्मिक गुरू श्रीएम यांनी दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संगात श्रीएम यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. दादासाहेब गायकवाड सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीएम म्हणाले, गुरू स्वत:चा नव्हे, तर कायम शिष्यांचाच विचार करतात. गुरुकृपेसाठी भाविकांनी आधी मनावरचा गंज काढावा. अनेकांना ते तमोगुणात असूनही सत्त्वगुणात असल्यासारखे वाटत राहते. तमोगुणातून आधी रजोगुणात यावे लागते, मगच सत्त्वगुणाकडे जाता येते. म्हणून झोपून राहू नका, जागे व्हा. झोपेतली साधना उपयोगाची नाही. जागृतावस्थेतील समाधीच तुम्हाला खरा आत्मानुभव देऊ शकेल. मनुष्य वा पशूंच्या अधिकाधिक सेवेनेच मन शुद्ध होईल व तुमची वाटचाल सत्त्वगुणाकडे सुरू होईल. ‘सर्वांत मोठा योगी कोण?’ असे अर्जुनाने कृष्णाला गीतेत विचारले. त्यावर बाराव्या अध्यायात कृष्णाचे उत्तर होते- जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या मनाची अवस्था सारखीच असते, तोच खरा योगी असतो. आपली निंदा करणारी व्यक्ती आपल्यासाठी चांगली असते. कारण तिच्यामुळे आपल्याला चुकांची जाणीव होते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास खऱ्या आनंदाची प्राप्ती होईल. लोकांकडे सगळे काही असूनही ते फाटक्या फकिराकडे का धावतात? कारण त्याला आत्मानुभव प्राप्त झालेला असतो, तो परमेश्वराच्या अधिक जवळ गेलेला असतो. तुम्हीही त्याच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा, असेही श्रीएम म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमात प्रारंभी श्रीएम यांच्या ‘वॉक आॅफ होप’ या पदयात्रेविषयी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. सायंकाळीही त्यांनी विश्वास लॉन्स येथे भाविकांना संबोधित केले. (प्रतिनिधी)
मनावरचा गंज साधनेद्वारे करा दूर
By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST