देवळाली कॅम्प : ‘मैत्रेय’च्या ठेवीदारांप्रमाणेच पोलीस प्रशासनाने इमू, आयएमएस या योजनांतील गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देत पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, कंपनी मालक, एजंटांना घेराव घालण्यात येणार आहे. भगूर परिसरात दोन-तीन वर्षांपूर्वी इमू पक्ष्याचे अंडे दोन हजार रुपयांप्रमाणे बुकिंग करत त्यापासून तीस दिवसांत दुप्पट तर ९० दिवसांत तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवत भगूर, देवळाली कॅम्पसह शहर-जिल्ह्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेत गुंतवणूक केली होती. इमूची योजना चालविणारा प्रमुख संशयित आरोपी हरिष दीक्षित याने तेव्हा भगूर, देवळाली कॅम्प, नाशिक आदि ठिकाणी गुंतवणूकदारांचे मेळावे घेऊन आश्वासन दिले होते. त्याच काळात भगूर गावातील काही युवकांनी अशाच पद्धतीने आयएमएस नावाची दामदुप्पट योजना काढून सर्वसामान्य नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल केली होती. मात्र इमूच्या पाठोपाठ आयएमएस योजनाचालकांनी गाशा गुंडाळत सर्वसामान्यांचे पैसे पुन्हा न देता पोबारा केला. या दोन्ही योजनांतील अनेक एजंट हे लखपती होऊन गेले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या योजनेतील एजंटांना तपासाकरिता ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कागदपत्रे व काही रक्कम ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचे पुढे काय झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही. गुंतवणूकदारांचा रोष वाढल्यानंतर इमू योजनेचा तपास प्रारंभी आर्थिक गुन्हे शाखा व त्यानंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. (वार्ताहर)
अन्य गुंतवणूकदारांच्या ठेवी मिळाव्यात
By admin | Updated: July 31, 2016 00:49 IST