शिवरायांच्या गडांवर पूर्वीप्रमाणे वृक्षराजी बहरावी आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाने आगामी शिवजयंतीच्या औचित्यावर निसर्गसंवर्धनाकरिता शिवप्रेमींना वृक्षलागवड व संवर्धन करण्याची साद घातली आहे. ‘वृक्षरूपी हिरवी मशाल गडावर लावूया, लाडक्या राजाचा गड हरित वृक्षांनी सजवूया’ असा अनोखा उपक्रम सामाजिक वनीकरणाने हाती घेतला आहे. नोंदणीकृत मंडळ तसेच इतर सामाजिक संस्थांनी आपले मागणीपत्र पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सामाजिक वनीकरण विभागाच्या गंगापूररोड येथील गंगाकाठ शासकीय रोपवाटिकेत प्रत्यक्षपणे जमा करावीत. प्रत्येक मंडळाला किमान २० रोपे मोफत पुरविली जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गुरुवारी (दि. १८) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रोपांचा पुरवठा सुरू राहणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. शिवप्रेमींकडून विधायक उपक्रमावर भर दिला जाणार आहे. हे लक्षात घेत निसर्ग संवर्धनाचा छत्रपती शिवरायांचा वसा पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
मिळवा मोफत रोपे अन् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST