लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१७-१८ सालासाठी फलोत्पादन यांत्रिकीकरणाचे लक्ष्यांक प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित फलोत्पादन औजारे व पीक संरक्षण उपकरणे मिळणार आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ मेपर्यंत तालुका कृषी कार्यालयात मागणीचे अर्ज जमा करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेंतर्गत २० अश्वशक्तीपर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्तीपर्यंत पॉवर टिलर, २० अश्वशक्तीपेक्षा कमी असलेले ट्रॅक्टर, पॉवर टिलरची चलित स्वयंचलित औजारे, फलोत्पादन औजारे, पीक संरक्षक उपकरणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. सिन्नर तालुक्यात २० अश्वशक्तीपर्यंत २५ ट्रॅक्टर, ८ अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमता असलेले ६, तर त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले ६ पॉवर टिलर, २० अश्वशक्तीपेक्षा कमी चलित ट्रॅक्टर/ पॉवर टिलरसाठी १० तसेच स्वयंचलित फलोत्पादन औजारे आणि पीक संरक्षक उपकरणे यासाठी प्रत्येकी एक लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती अर्जासोबत चालू वर्षाचा सातबारा उतारा, फळपीक, भाजीपाल्याची नोंद असलेला ८ अ चा उतारा, बॅँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पॅन कार्ड/ रेशन कार्ड, ट्रॅक्टर किंवा औजारांसाठी लागणारे कोटेशन असा प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावयाचा आहे. जुन्या ट्रॅक्टरसाठी अनुदान देय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करू नये, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीतून यावेळी सूट देण्यात आली आहे.
फलोत्पादन यांत्रिकीकरणाचे लक्ष्यांक प्राप्त
By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST