नाशिक : गर्जा महाराष्ट्र माझा, देशासाठी रणभूमीवर प्राण ज्यांनी वाहिला, घ्या मानाचा मुजरा, शौर्याची परंपरा, तानाजीच्या शौर्याचा पोवाडा यांसह विविध परंपरागत गीतांच्या मराठी बाण्याने हरिहर भेट महोत्सवात शूरवीरांच्या आठवणी जागवताना महाराष्ट्राचा इतिहास श्रोत्यांसमोर उभा करण्यात आला़ सुंदरनारायण मंदिर येथे आयोजित हरिहर भेट महोत्सवात शाहीर दत्ता वाघ व त्यांच्या कलापथकाने ‘गावरान ठेवा’ हा कार्यक्रम सादर केला़ सर्वप्रथम शाहीर दत्ता वाघ यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी गण व नांदी सादर केली़ यानंतर उमा रोकडे यांनी दही दूध लोणी, घागर घेऊन निघाली पाण्या गौळण.. अशा गौळणी सादर केल्या़ दत्ता वाघ यांनी ‘सुंदरनारायण मंदिर महात्मा..’ हे गीत सादर केले़ तसेच हुतात्म्यांना मानाचा मुजरा केला़ मदन केदारे यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा..’ हे गीत, शिवाजी निकम यांनी ‘शौर्याची परंपरा..’ व ‘दुनिया बदलून गेली सारी..’ ही गीते सादर केली़ नारायण ठोंबरे यांनी शिवाची भीमाई हे गीत सादर केले़ बाळासाहेब रूडकर यांनी खड्या आवाजात तानाजीचा पोवाडा सादर करताना शिवकालीन रणांगण श्रोत्यांसमोर उभे केले़ शाहीर वाघ यांनी अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध ‘माझी मैना गावाकडं राहिली..’ ही लावणी सादर केली़ तसेच नाशिकची लावणी सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली़ यांसह वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकगीते, भारूड, भावगीते सादर करत कार्यक्रमात रंग भरले़ त्यांना ढोलकीवर दादाराव घाटे, संवादिनी हेमंत खरोटे, आॅरगन संदीप जगताप, कोरस बाळासाहेब रूडकर, मदन केदारे, नारायण ठोंबरे यांनी साथ दिली़ तत्पूर्वी सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले़ सुंदरनारायण मित्रमंडळाच्या वतीने निबंध स्पर्धा, चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या़ सायंकाळी रेखा जोशी यांच्या श्रीराम भजनी मंडळाने विविध भजने, गौळणी व भक्तिगीते सादर केली़ (प्रतिनिधी)
‘गावरान ठेवा’त मऱ्हाटमोळ्या लोकगीतांची मेजवानी
By admin | Updated: November 6, 2014 00:22 IST