मालेगाव : आमदार निधीतून महापालिकेला सन २०१७-१८ मध्ये कचराकुंड्या पुरविण्यात आल्या होत्या; मात्र या कुंड्या ६० लिटरच्या असल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी देत नस्ती बंद केली होती. मात्र बुधवारी (दि.२३) झालेल्या महासभेत कचराकुंडी पुरविणाऱ्या ठेकेदाराला चाैकशीअंती देयक अदा करण्याच्या विषयाला महासभेने मंजुरी दिली आहे. या विषयाला एमआयएम व महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. दरम्यान, महासभेने भूसंपादनाचे चार विषय नामंजूर केेले आहेत. तर कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना महापालिका फंडातून १० लाख रुपये आर्थिक मदत देण्याच्या विषयाला महासभेने मंजुरी दिली आहे. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर निलेश आहेर, आयुक्त दिपक कासार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन महासभा पार पडली. विषय पत्रिकेवरील प्रारंभीचे भूसंपादनाचे विषय चर्चे अंती तहकूब करण्यात आले. तर उपमहापौर आहेर यांनी प्रभाग ४ मधील जलवाहिनी देखभाल-दुरुस्तीचे काम निविदेप्रमाणे झाले नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या कामाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कासार यांनी दिले. डी. के. कॉर्नर ते सोयगाव मराठी शाळा येथे भुयारी गटार तयार करण्यासाठी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद शहरातील अविकसित भागाचा विकास करणे या शीर्षकात करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. चर्चेत डॉ. खालीद परवेझ, निलेश आहेर, मदन गायकवाड, अस्लम अन्सारी आदींसह नगरसेवकांनी सहभाग घेतला.
इन्फो
अंत्यविधीसाठी आता गोवऱ्यांचा वापर
शहरात अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱ्यांचा वापर करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. यासह नळजोडणी शुल्क दोन टप्प्यात भरण्याच्या, मनपा कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम व विमा संरक्षण विषयांना मंजुरी देण्यात आली, तर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत नगरसेवकांनी सुचविलेल्या प्रस्तावित विकासकामांनाही मान्यता देण्यात आली आहे. विविध चौकांच्या नामफलकांच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिका कर्मचारी जीवन महिरे यांनी कोविडकाळात केलेल्या कामाची लघुचित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.