गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा झालेला उद्रेक व त्यातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निर्माण झालेला क्षोभ पाहता गंगापूर धरणाच्या पाण्याचा प्रश्न अतिशय संवेदनशील झाला आहे. त्यामुळे धरणात सध्या असलेला साठा व त्यावरील आरक्षणे पाहता, नाशिक महापालिकेला पाण्यात कपात करण्याची वेळ आलेली आहे. ही कपात करावी की न करावी यावरून भाजपाविरुद्ध मनसे, सेना, कॉँग्रेस असा सामना रंगून शहरातील राजकारण पाण्याभोवती फिरत असताना गंगापूर धरणातून मार्च महिन्यात २२५ दशलक्ष घनफूट पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. निफाड तालुक्यातील निऱ्हाळे, दातने, दिक्षी आदि गावांसाठी सदरचे पाणी सोडण्यात येणार असल्याने नाशिककरांकडून या पाण्याला विरोध होण्याची भीती प्रशासन व्यक्त करू लागली आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहता धरणांमधील पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यातही पाण्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असून, सर्वात प्रथम पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व सरतेशेवटी उद्योगासाठी पाणी दिले जावे, असे धोरण शासनाने स्वीकारलेले असताना नाशिक शहरात पिण्याच्या पाण्यात कपात एकीकडे केली जात असताना दुसरीकडे मात्र शेतीसाठी पाणी सोडण्याची बाब अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
गंगापूरचे पाणी पेटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 22:46 IST