नाशिक : गुरुवारी रात्री ९.३१ वाजता ध्वजावतरणाने सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता झाली आणि त्याचवेळी गोदावरीतीरी रामकुंडालगत असलेल्या प्राचीन गंगा-गोदावरी मंदिराचेही दरवाजे बारा वर्षांसाठी बंद करण्यात आले. दर बारा वर्षांनी उघडणाऱ्या गंगा-गोदावरी-भागीरथी मंदिराचे कुलूप वर्षातून दोन दिवस उघडले जात असले तरी सदर मंदिर सन २०२७ सालीच भाविकांना संपूर्ण तेरा महिन्यांच्या कालावधीकरिता खुले केले जाईल. मंदिराचे कपाट बंद होण्यापूर्वी दिवसभरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता गुरुवारी रात्री झाली. याचवेळी रामकुंडालगत असलेल्या आणि दर बारा वर्षांनी उघडणाऱ्या गंगा-गोदावरी-भागीरथी मंदिरालाही कुलूप लावण्यात आले. या मंदिरात गोदावरी आणि भागीरथीची स्वयंभू मूर्ती असून, सिंहस्थ कुंभपर्व काळातील तेरा महिन्यांच्या कालावधी व्यतिरिक्त सदर मंदिर कार्तिक शुद्ध पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा आणि गोदावरीच्या जन्मोत्सवाच्या वेळी ज्येष्ठ शुद्ध दशमीला एक दिवसासाठी खुले केले जाते. (प्रतिनिधी)
गंगा-गोदावरी मंदिराचे दरवाजे बंद
By admin | Updated: August 12, 2016 01:29 IST