नाशिक : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ)च्या नाशिक विभागीय कार्यालयाने १५ लाखांहून अधिक खातेधारकांची खाती अवघ्या साडेसहा तासात अद्ययावत केली आहेत. खातेधारकांना आता २०१४-१५ या वर्षाच्या अखेरीस असलेली आपल्या खात्यावरील शिल्लक पाहता येणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनने गेल्या काही वर्षांमध्ये ई-गव्हर्नन्सला प्राधान्य दिले असून, सर्वच व्यवहार आॅनलाइन होत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत संघटनेच्या देशभरातील सर्वच कार्यालयांनी आपल्या खातेदारांच्या खात्यांवरील व्यवहार अद्ययावत करण्याचे कार्य हाती घेतले. त्यानुसार नाशिक येथील क्षेत्रीय कार्यालयाने ७५१७ आस्थापनांच्या १५ लाख ९ हजार ६८० सभासदांच्या खात्यांवरील सर्व नोंदी अवघ्या साडेसहा तासांच्या विक्रमी वेळेत अद्ययावत केल्याची माहितीही तांबे यांनी दिली. आता खातेदारांना मार्चअखेर त्यांच्या खात्यावर असलेली एकूण रक्कम आणि मार्चअखेरचे व्याज अशी रक्कम आॅनलाइन बघता येणार आहे. ईपीएफओच्या या कार्यक्षमतेबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
भविष्य निर्वाह निधी खाती अद्ययावत
By admin | Updated: April 4, 2015 01:18 IST