नाशिकरोड : जळगाव मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील झोपडपट्टीत दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या संशयिताच्या जळगाव पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात मुसक्या आवळल्या आहेत.जळगाव मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीतील झोपडपट्टीत राहाणारी १० वर्षाच्या मुलीची आई महिनाभरापूर्वीच मयत झाल्याने ती तेथे जवळच झोपडपट्टीत राहाणाऱ्या मामाच्या घरी राहाण्यास होती. ती दहा वर्षाची मुलगी व तिची अंध आजी गेल्या सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरात एकट्या होत्या. यावेळी त्याच परिसरात राहाणारा संशयित रिक्षाचालक राजु रमेश निकम (वय ४२) याने घरात घुसून त्या मुलीचे तोंड दाबुन शंभर रुपये देतो असे आमिष दाखवत बलात्कार केला. त्यानंतर संशयित राजु निकम हा पळुन गेला. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुसक्या आवळल्या संशयीत फरारी राजु निकम हा नाशिक परिसरात आल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळताच कॉन्स्टेबल मनोज सुरवाडे, विजय पाटील हे शुक्रवारपासुन नाशिक शहर परिसरात संशयितांचा शोध घेत होते. संशयित नराधम राजु निकम याचा फोटो पोलीस व नागरिकांच्या व्हॉटस्अपवर व्हायरल झाला होता. संशयित राजु हा शनिवारी दुपारी मनमाडच्या एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्याने कॉन्स्टेबल सुरवाडे, पाटील हे नाशिकरोडमधुन मनमाडला जाण्याच्या तयारीत असतांनाच शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकाच्या परिसरात राजु त्यांना दिसला. दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित राजुला घेऊन पोलीस रेल्वेने दुपारनंतर जळगावला रवाना झाले. (प्रतिनिधी)
बलात्कार करून फरारी संशयीतास अटक
By admin | Updated: July 23, 2016 22:38 IST