लासलगाव : देवगाव येथे ३० डिसेंबरला जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेचा पोलीस सखोल तपास करत नसल्याने प्रकरणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी नि:पक्षपातीपणे प्रकरणाचा सखोल तपास करावा, या मागणीसाठी देवगाव येथे गावकऱ्यांनी रविवारी गाव बंद आंदोलन करून पोलिसांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. तसेच मंगळवारी (दि. ५) नाशिक-औरंगाबाद महामार्गावर भरवस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अकरावीत शिकत असलेल्या मनीषा चोपडे या विद्यार्थिनीचा कॉलेजवरून दुपारी घरी आल्यानंतर काही वेळाने तिच्या घरापासून काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटना गूढरीत्या घडल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी निफाडऐवजी नाशिकला जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. घटनेला चार दिवस उलटूनही पोलिसांकडून उलगडा झालेला नाही. पोलिसांनी संशयित ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे देवगावच्या ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळून आला होता. विद्यार्थिनीचा अत्याचार करून खून करण्यात आला असावा आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, अशी चर्चा गावात होत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी आज पोलिसांच्या रेंगाळलेल्या तपासाविरोधात आणि संशयित मोकाट असल्याने घटनेचा सखोल तपास करण्यासाठी मूक मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभेत झाले. मृत विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेत पोलिसांवर संताप व्यक्त करून तपासाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. शोकसभेत देवगावचे उपसरपंच विनोद जोशी यांनी पोलिसांवर आरोप करताना सांगितले की, मुलीचा खून झालेला असताना ते प्रकरण आत्महत्त्या केल्याचा देखावा पोलीस करत आहेत. घटनेच्या सूत्रधारांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना विभागप्रमुख शिवा सुराशे, धनंजय जोशी, प्रशांत कुलकर्णी, बद्रिनाथ लोहारकर, राजेंद्र मेमाणे, वसंत अढांगळे यांनी पोलिसांना आवाहन केले की, घटनेचा तपास तटस्थपणे करावा. यावेळी भास्कर बोचरे, जगदीश लोहारकर, राजेंद्र चोपडे यांच्यासह गावातील दीड ते दोन हजार ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
संतप्त गावकऱ्यांचा मोर्चा
By admin | Updated: January 3, 2016 22:38 IST