त्र्यंबकेश्वर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे एका राजकीय पक्षाच्या इच्छुकाकडून आयोजित मेळावा त्याच पक्षातील काहींनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला! त्यामुळे काही काळ वातावरण तापले. तद्नंतर जर या पक्षाच्या इच्छुकांमध्येच वाद होत असतील तर इगतपुरी मतदारसंघाची जागा मित्रपक्षाच्या वाट्यास द्यावी, अशी मागणी पुढे आली त्यामुळे शहरात चर्चेला आणखी एक विषय मिळाला.विधानसभा निवडणुकीतील पक्षीय उमेदवार जाहीर होण्यास अजून काही कालावधी आहे. त्याआधी चाचपणी आणि शक्तिप्रदर्शन करीत पक्षीय उमेदवारी मिळावी यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्याचा इच्छुक प्रयत्न करीत आहेत. शासकीय सेवेत असणारे एक वनसंरक्षक शिवसेनेकडून नशीब अजमाविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी चाचपणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आदिवासी बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. सदर इच्छूक मेळावास्थळी दाखल होण्यापुर्वीच शिवसेनेतील अन्य इच्छूकांचे समर्थक तेथे आले. त्यांनी आपापल्या नेत्यांच्या नावांच्या घोषणा देत सदर मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरण तापले. सदर मंडळी निघून गेल्यानंतर आयोजक इच्छुकाचे मेळावास्थळी आगमन झाले. तोवर मेळाव्यासाठी आलेल्या मंडळींची भोजनावळ सुरू होती. अखेर मेळावा पार पडला खरा पण जर उमेदवारीवरून शिवसेनेत सुंदोपसुंदी असेल तर इगतपुरी मतदारसंघातील जागा युतीने भाजपाच्या वाट्यास द्यावी, अशी नवी मागणी पुढे आली आहे. (वार्ताहर)
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग सुंदोपसुंदीचे मुक्त दर्शन!
By admin | Updated: June 20, 2014 01:20 IST