नाशिक : एटीएममधून वृद्धास पैसे काढून देण्याच्या नावाखाली एटीएमची अदला-बदल करून वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून अठरा हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या राहुरी येथील भामट्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़लहवित येथील सिद्धार्थनगरमधील रहिवासी अर्जुन भिकाजी सोनवणे (६४) हे २७ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प रोडवरील देवी मंदिराच्या समोर असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते़ या ठिकाणी असलेल्या संशयित जालिंदर कारभारी ढोकणे याने सोनवणे यांना मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे म्हणून त्यांचे एसबीआयचे एटीएम कार्ड व पासवर्ड विचारून घेतला़ यानंतर पैसे निघत नसल्याचे सांगून भीमराव बाबर नावाचे एटीएम कार्ड सोनवणे यांना परत केले व सोनवणे गेल्यानंतर त्यांच्या खात्यातून १८ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली़ यानंतर सोनवणे यांनी संशयित ढोकणेसोबत संपर्क केल्यानंतर फसवणूक केलेली रक्कम परत करतो असे सांगून पैसे परत केले नाही़ याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक
By admin | Updated: April 8, 2017 16:50 IST