नाशिक : नाटकात जातपात-धर्म-पंथाला महत्त्व न देता केवळ कलेवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने त्यातून बंधुत्वाचा संस्कार रुजतो. त्यामुळे चांगला माणूस तयार होण्यासाठी बालनाट्य चळवळ महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता नागपुरे यांनी केले. सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाले, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येत्या १२ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, त्यात एकूण ३४ नाटके सादर होणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. परीक्षक रमाकांत मुळे (औरंगाबाद), कैलास पप्पूलवाड (नांदेड), नविनी कुलकर्णी (मुंबई), स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नागपुरे म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून व्यक्त केलेल्या भावनेचा प्रत्यय नाटकातून येतो. विश्वबंधुत्वाचा प्रसार करण्याची आज सर्वाधिक गरज असून, त्यासाठी नाटक महत्त्वाचे वाटते. बालनाट्यातून मुलांवर होणाऱ्या संस्कारातून चांगले अभिनेते, चांगली माणसे घडतात. मुलांना नाटकांचा करिअरमध्येही उपयोग होतो. त्यामुळे बालनाट्याची चळवळ सुरू राहायला हवी. रवींद्र कदम यांनी सांगितले की, मुलांनी केवळ पुस्तकी किडे न राहता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरतात. गेल्या वर्षी नाशिकच्या बालनाट्याने राज्यात यश मिळवल्याने यंदाही त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
नाटकातून बंधुत्वाचा संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2015 00:08 IST