नाशिक : यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खरिपाचे पिके हातची जाऊन रब्बीलाही धोका निर्माण झाल्याने जिल्ह्णातील १५७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांना मात्र त्यातून वगळण्यात येऊन उर्वरित बारा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातील जनतेला दिलासा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाने खरीप हंगामातील पिकांची नजर पैसेवारी केली असता तेव्हाच संपूर्ण खरीप शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याचे स्पष्ट झाले, परंतु अशाही परिस्थितीत सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी खरीप पिके घेणारी १६७७ गावे असून, २८३ गावे रब्बी पिकांची आहेत. नजर पाहणीतून १३६८ गावातील खरीप पिकांची अवस्था ५० पैशांहून कमी असून, रब्बीचे २०९ गावांमधील पिकांची परिस्थिती ५० पैशांपेक्षा कमी आहे अशा प्रकारे १५७७ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र नाशिक, इगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यांतील खरीप पिके घेणाऱ्या गावांमधील गावांमधील परिस्थिती समाधानकारक असल्याने त्यांना यातून वगळण्यात आले आहे.
चौदा हजार गावांत दुष्काळ!
By admin | Updated: October 16, 2015 23:21 IST