नाशिक : शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका व देवळाली कॅन्टोमेंटबोर्डाच्या क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांमध्येमध्ये विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुविधा केंद्र असणार आहे. प्रवेशअर्ज दोन भागात करावा लागणार आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती घेतली जाणार असून, निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले जातील. या अर्जांच्या आधारे साधारणत: १५ जून ते १५ जुलै या महिनाभराच्या कालावधीत चार वेगवेगळ्या फेऱ्यांध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, गरजेनुसार अधिक फेऱ्या घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या बैठकीत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विविध उच्च माध्यमिक विद्यालये तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक तथा प्राचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोमेंटबोर्डाच्या क्षेत्रात एकूण ५२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ हजार ५६० जागा आहेत. या सर्व जागा केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे आॅनलाइन पद्धतीने भरण्यात येतील. यासाठी माध्यमिक शाळांमध्ये माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुस्तिकेतील सूचनांच्या आधारे शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती निकालापूर्वी भरणे अनिवार्य आहे. यात विद्यार्थ्यांचे नाव, जात संवर्ग, जन्मतारीख, पत्ता आदि या माहितीच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरणे शक्य होईल. शहराबाहेरील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पहिल्या फेरीनंतर शाखा बदलण्याचा अधिकारदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्रांचे कार्यवाह म्हणून प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. वैभव सरोदे यांनी प्रवेशप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी दिलीप गोविंद, सुनीता धनगर, अशोक बागुल, वाय. पी. निकम आदि उपस्थित होते. आभार प्रा. अशोक सोनवणे यांनी मानले. (प्रतिनिधी)
चार फेऱ्यांत अकरावीचे आॅनलाइन प्रवेश
By admin | Updated: April 2, 2017 01:27 IST