चाळीसगाव (जि. जळगाव) : सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रमशाळा, करगाव येथे शिक्षणसेवकाच्या वेतन प्रस्तावाची मंजुरी मिळवून देण्यासाठी एक लाख ६३ हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या संस्था सचिवासह मुख्याध्यापक, लिपिक, उपशिक्षक या चार जणांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ७ रोजी दुपारी ४.२० वाजता केली. याच शाळेतील शिक्षणसेवक नरेंद्र जामसिंग नाईक यांच्याकडून नोकरीसाठी सुरुवातीला ९ लाख घेतले व नंतर ३ लाख रुपये त्यांच्याकडून घेण्यात आले. ही रककम घेवूनही संस्था सचिव सुभाष गुलाबसिंग चव्हाण यांनी वेतन प्रस्ताव मंजुरी मिळविण्यासाठी १ लाख ९९ हजार रुपयाची मागणी केली व ही रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितले. (पान ९ वर)त्रस्त झालेल्या नाईक यांनी याबाबतची तक्रार ६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव कार्यालयात केली. तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत विरोधी पथकाने संस्था कार्यालयात सापळा रचला. संस्था सचिव सुभाष चव्हाण यांच्या सांगण्यावरुन प्राथमिक शाळा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर विश्राम पाटील, माध्य. मुख्याध्यापक सुभाष पवार, वरिष्ठ लिपिक अशोक जाधव, उपशिक्षक नारायण महाजन यांनी नाईक यांच्याकडून तडजोडी अंती १ लाख ६३ हजार रु. लाचेची रक्कम स्वीकारुन ही रक्कम चौघे कार्यालयात मोजत असताना पथकाने रंगेहाथ पकडले. याच वेळी अन्य शिक्षणसेवकांनी देखील दिलेले १ लाख ६३ हजार रुपये देखील पथकाने हस्तगत केले. या कारवाईनंतर संस्था सचिव सुभाष गुलाबसिंग चव्हाण यांना नाशिक येथून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. (वार्ताहर)
नाशिकच्या लाचखोर संस्था सचिवासह चौघांना अटक
By admin | Updated: August 8, 2014 01:45 IST