नाशिक : प्रख्यात आध्यात्मिक गुरू श्रीएम तथा मुमताज अली खान यांच्या ‘वॉक आॅफ होप’ या पदयात्रेचे नाशकात आज आगमन झाले. जानेवारीपासून सुमारे तीन हजार किलोमीटर अंतर पायी पार करीत ही यात्रा नाशकात दाखल झाली असून, उद्या (दि. ३१) सकाळी १० वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृहात सभा होणार आहे. केरळमधील त्रिवेंद्रम येथे जन्म झालेले श्रीएम हे आध्यात्मिक ओढीमुळे वयाच्या अठराव्या वर्षांपासून हिमालयात निघून गेले. गुरू महेश्वरनाथ व विविध धर्मीय संतांकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर ते आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले. गुरू महेश्वरनाथ यांनी वीस वर्षांपूर्वी त्यांना पदयात्रा करण्याची आज्ञा केली होती. गेल्या तीन वर्षांपासून या यात्रेची तयारी सुरू होती. देशात शांती, सलोखा, एकता प्रस्थापित करण्यासाठी १२ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी कन्याकुमारी येथून सत्तर अनुयायांसमवेत पदयात्रेला प्रारंभ केला. सुमारे तीन हजार किलोमीटर अंतर पार करून, तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांत फिरून ते महाराष्ट्रात दाखल झाले. ही पदयात्रा आज नाशिकरोड येथे पोहोचली. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्या (दि. ३१) सकाळी १० वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात श्रीएम यांची सभा होणार आहे. ही पदयात्रा शहरात तीन दिवस म्हणजे २ आॅगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर यात्रा महिरावणीच्या दिशेने पुढे जाईल. यात्रेला श्रीनगरपर्यंत सुमारे पाच हजार किलोमीटर अंतर कापायचे आहे. (प्रतिनिधी)
श्रीएम यांची पदयात्रा नाशकात
By admin | Updated: July 31, 2015 00:40 IST