४५ दिवसांत क.का. वाघ येथे उतरविलेला जुना उड्डाणपूल हा आडगावकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला जोडला जात आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून सदरच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येऊन वाहतूक मार्गात काम पूर्ण होईपर्यंत बदल कायम राहणार आहे.
जुन्या उड्डाणपुलावरून धुळे बाजूने वाहतूक सुरू होती, तर आता द्वारकावरून वाहतूक खाली उतरविण्यात येऊन उड्डाणपुलावर प्रवेशबंदी करून, द्वारका येथून वाहने कन्नमवार पूल, ट्रॅक्टर हाउस, तपोवन चौफुली, संतोष टी पॉइंट श्री स्वामी नारायण चौकातून, अमृतधाम चौफुलीमार्गे धुळ्याकडे जात आहे, तर रॅम्पवरून पुलावर जाण्यासाठी काम पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
जुना व नवीन पूल जोडणी काम वेगाने सुरू असून, नवीन पुलावर असलेले दोन्ही बाजूचे संरक्षित कथडे सिमेंट काँक्रीटने भरण्याचे काम केले जात आहे, तर काही ठिकाणी नवीन उड्डाण पुलाखाली रस्ता, तसेच दुभाजक तयार करण्यात येऊन त्यात माती टाकण्याचे काम केले जात आहे. नवीन उड्डाण पूल पूर्ण झालेल्या ठिकाणी पुलाखाली जॉइंट असलेल्या भागात सिमेंट भरण्याचे काम सुरू आहे.