नाशिक : शहरात ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व उत्साह संचारला असून जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा मंगळवारी शहरातील पोलीस संचलन मैदानावर सकाळी ९.१५ मिनिटांनी शहरातील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्यास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे उपस्थित राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्ह्यातील मुख्य सोहळा पोलीस संचलन मैदानावर होणार असून या सोहळ्याला सकाळी ८.३० वाजेपासून सुरूवात होणार असून ९.१५ वाजता ध्वजारोहण होणार आहे. तर ९. ३३ मिनिटांनी पारितोषिक वितरण सोहळा सुरू होणार आहे. या सोहळ्यासाठी गणवेशधारी अधिकाऱ्यांनी नियमानुसार पोषाखात तर नागरी शासकीय अधिकारी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी समारंभ सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर आसनस्त होण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही बॅग सोबत न आणण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इन्फो
ग्रीन बॅरेकसमोर वाहनतळ
ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख अतिथींची वाहने परेड मैदानाच्या गेटमधून येणार असून ध्वजस्तंभाच्या मागील जागेत या वाहनांची पार्किंग असणार आहे. तर पोलीस अधिकारी व अन्य नागरिकांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून येण्याच्या सूचना करण्यात आल्या असून नागरिकांची व पोलिसांची वाहने ग्रीन बॅरेकसमोर पार्क करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.