इंदिरानगर : पावसाने उघडीप घेताच साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांमुळे रोगराईने डोके वर काढले आहे. सिडको पाठोपाठ आता प्रभाग ५२ मधील सराफ नगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी जोरदार पाऊस झाल्यानंतर आता रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला जात असताना हा प्रकार घडला आहे. सराफनगर येथील वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत पंधरा वर्षांपूर्वी वास्तवात आले आहे. यामध्ये कॉलनी, सोसायटी व अपार्टमेंट आहेत; मात्र तीन हजार लोकसंख्या असलेल्या या भागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे सराफनगरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूसदृश आजार झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. हे पाचही रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या परिसरात अनियमित घंटागाडी आणि सफाई कामगारांमुळे अस्वच्छतेचे वातावरण असून डासांचा प्रचंड प्रादुर्भाव आहे. महापालिकेच्या वतीने या परिसरात डास प्रतिबंधक धूर फवारणी होत नसल्याने नागरिकांना अधिक त्रास होत आहे. महापालिकेने या भागात तातडीने उपाययोजना कराव्या, परिसरात स्वच्छता करून डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
इंदिरानगरात पाच संशयित डेंग्यू रुग्ण
By admin | Updated: August 17, 2016 00:26 IST