नाशिक : कळवण तालुक्यातील हतगड किल्ल्यावर तब्बल पाचशे वर्षांपूर्वीचा अप्रकाशित शिलालेख प्रकाशात आला आहे. येथील गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी हा शिलालेख शोधून काढला असून, हा देवनागरी लिपीतील महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील सर्वांत मोठा शिलालेख आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळा पर्वतरांगेतील हातगड किल्ला राज्यभरातील गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहे. सापुताऱ्याच्या घाटमाथ्यावर वसलेला हा किल्ला अनेक प्राचीन अवशेषांनी समृद्ध आहे; परंतु इतिहासात या किल्ल्याच्या नोंदी अत्यंत तुरळक आहेत. गेल्या आठवड्यात गिर्यारोहक सुदर्शन कुलथे हे या किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले असता, मुख्य प्रवेशमार्गावरून बाहेरच्या बाजूने अवघड मार्गाने किल्ल्याभोवती पाहणी करीत असताना, किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या बुरुजाखाली त्यांना हा शिलालेख दिसून आला. वहिवाट नसलेल्या भागात असल्याने या शिलालेखाकडे आजवर कुणाचेही लक्ष गेलेले नव्हते. या शिलालेखावर देवनागरी लिपीत संस्कृत भाषेत सोळा ओळी कोरलेल्या आहेत. आजही सुस्थितीत असलेला हा उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट, तर रुंदीला दोन फूट चार इंच आकाराचा आहे. शिलालेखातील अक्षरे तीन इंच उंचीची असून, हा शिलालेख जमिनीपासून साडेसहा फूट उंचीवर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील देवनागरी भाषेतील हा सर्वांत मोठा शिलालेख असल्याचे कळते. कुलथे यांना या संशोधनासाठी वनविभाग, कनाशी प्रांताचे ए. एन. आडे, आणि अभ्यासक गिरीश टकले यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
पाचशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा शोध
By admin | Updated: March 22, 2016 00:02 IST