नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था टिकून रहावी व पोलीस-नागरिकांमध्ये सुसंवाद अधिकाधिक जोपासला जावा, या उद्देशाने गेल्या एक तारखेपासून ‘व्हॉट्स अॅप’ सेवा सुरू केली आहे. या सेवेला नाशिककरांकडून प्रतिसाद मिळण्यास प्रारंभ झाला असून, आठवडाभरात पाचशे पोस्ट गुन्हेगारीशी संबंधित प्राप्त झाल्या आहेत.शहरातील गुन्हेगारीशी संबंधित माहिती, छायाचित्र नागरिकांनी व्हॉट्स अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावी, असे आवाहन पोलीस उपआयुक्त श्रीकांत ढिवरे यांनी आठवडाभरापूर्वी नवीन क्रमांकाची माहिती देत केले होते. माहिती देणाऱ्या नाशिककरांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाबाबतची संपूर्ण गोपनीयता बाळगली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीला ‘गुड मॉर्निंग,’ ‘शुभ रात्री,’च्या संदेशांबरोबरच शायरी आणि विनोदांच्या पोस्टही सेण्ड करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पहिले दोन दिवस गुन्ह्यांच्या तक्रारी कमी अन् गोडव्याच्या संदेशांचा वर्षाव व्हॉट्स अॅपवर होत होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी प्रसारमाध्यमांकरवी या क्रमांकावर केवळ गुन्हेगारी संबंधित पोस्टच पाठवाव्यात, असे आवाहन केले गेले. त्याचा सकारात्मक फायदा पोलिसांना झाला असून, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जुगार, क्लब, अवैध व्यवसाय, टवाळखोरांचा धुमाकूळ, मद्यपींचा उपद्रव, भुरट्या चोरांचा प्रताप आदिंची माहिती व्हॉट्स अॅपवर नाशिककरांकडून प्राप्त होऊ लागल्याचे ढिवरे यांनी सांगितले.
पोलिसांना आठवडाभरात पाचशे व्हॉट्स अॅप संदेश
By admin | Updated: October 9, 2015 22:18 IST