नाशिक : प्रशासनाने शनिवारचा निर्बंध शिथिल केल्यानंतरच्या पहिल्याच शनिवारी शहरातील मेन रोडसह बहुतांश बाजारपेठांमध्ये शनिवारी गर्दीचा महापूर उसळला होता. बहुतांश नागरिकांनी मास्क घातलेले असले तरी काही बेशिस्त नागरिकांचा त्या गर्दीतही वावर होता. दरम्यान, अनेक दुकानदारांमध्येदेखील शनिवारच्या वेळेबाबत संभ्रम असल्याचे दिसून आले असून, शासकीय आदेशानुसार आज, रविवारपासून (दि. १५) निर्बंध शिथिल होणार असले तरी ते शनिवारपासूनच शिथिल झाल्यासारखी परिस्थिती होती.
प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असतानाही शहरातील अनेक दुकाने उशिरापर्यंत सुरू होती. तसेच दुकानदारांमध्ये वेळेच्या मर्यादेबाबतचा संभ्रम दिसून आला, तर रविवारी स्वातंत्र्य दिन असल्याने या रविवारी दुकाने खुली ठेवायची का, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकतेचे वातावरण होते. तसेच नागरिकांनीदेखील रविवारी बंद राहण्याची शक्यता गृहीत धरून मेनरोड, एम.जी. रोडसह रविवार कारंजा या मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. मेन रोड परिसरातील बहुतांश दुकानांसमोर खोदकाम झाले असूनही त्यावर टाकलेल्या फळ्यांवरूनही नागरिक दुकानांमध्ये जाऊन खरेदी करीत होते. त्यातच सायंकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्यानेदेखील नागरिकांसह विक्रेत्यांनी पर्वणी साधून घेतली.
इन्फो
ब्रेक द चेन आजपासून लागू
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात ब्रेक द चेनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आज, रविवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. नवीन आदेशानुसार पात्र ज्या बाबींचा नव्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे, त्यानुसार सर्व नियम, अटींचे पालन करून तसेच आदेशातील निर्बंधांचे जसेच्या तसे पालन करून निर्देश मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून सर्व सुधारित मार्गदर्शक सूचना लागू होऊ शकणार आहेत.