नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारी (दि.२८) प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला विभागातील ११ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. यंदा एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्या नऊ भरारी पथकांची यंदा परीक्षांवर करडी नजर असून, यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने ११ जणांना पहिल्याच दिवशी कॉपी करताना पकडले. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांतील ९५२ महाविद्यालयांतील २१८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यात इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे २, जळगावला २, नंदुरबारला एक आणि सर्वाधिक धुळ्याला ६ कॉपीबहाद्दरांवर शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली आहे. विभागातील ६५ हजार ६४६ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी तर कला शाखेचे ७३,०२७ व वाणिज्य शाखेचे २२,३९७ असे एकूण एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर भरारी पथकाची नजर राहणार असून, भरारी पथकाचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि निरंतर याप्रमाणे भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात चार ते पाच सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच प्रत्येक पथकात एक महिला याप्रमाणे नऊ महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पहिल्याच पेपरला ११ कॉपीबहाद्दर
By admin | Updated: March 1, 2017 00:39 IST