नाशिक : आचारसंहितेनंतर प्रथमच झालेली महासभा दिवगंत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे, नव्या महापौरांची ही पहिलीच महासभा होती.महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे महिनाभर महासभा किंवा अन्य कोणत्याही महासभा झाल्या नाहीत. कोणत्याही महिन्याची महासभा त्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत घेणे बंधनकारक असल्याने सोमवारी महासभा आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता संपल्याचे अधिकृत जाहीर न झाल्याने महासभेत केवळ एका इतिवृत्त मंजुरीचा विषय होता. तथापि, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या मातोश्री कृष्णावती, नगरसेवक संजय चव्हाण यांच्या मातोश्री हिराबाई, तसेच शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांचे निधन झाल्याने नगरसेवकांनी शोकप्र्रस्ताव मांडला. त्यानुसार दिवगंत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)