नाशिक : दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके व मोेफत गणवेश वाटपाचा मुहूर्त चुकत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना यावर्षी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके मिळतील याची दक्षता घ्या, असे आदेश दिले.पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा उघडणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचा आढावा सुखदेव बनकर यांनी घेतला. त्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके आणि मोेफत गणवेश मिळेल, याची दक्षता घ्यावी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी करून त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केल्या. तसेच येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने शाळांना सूचना द्याव्यात, त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके
By admin | Updated: June 12, 2015 01:38 IST