नाशिक : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बुधवारपासून (दि.१३) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ नियमानुसार दहावीच्या परीक्षेत ९० ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणानुसार या फेरीचे सहा टप्पे करण्यात आले असून, त्यानुसार पुढील प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ नियमानुसार १३ जानेवारीपासून ९० ते १०० टक्के गुणप्राप्त विद्यार्थी अलॉटमेंटसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार असून, १३ ते १५ जानेवारी - सायंकाळी ५ वाजेपर्यंत अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, तर १५ जानेवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत विद्यालयांसाठी झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दि.१६ व १८ दरम्यान ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांसाठी अशीच प्रक्रिया राबविली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात दि. १९ व २० दरम्यान ७० टक्क्यांहून अधिक, चौथ्या टप्प्यात (दि. २१ व २२ दरम्यान ६० टक्क्यांहून अधिक, पाचव्या टप्प्यात दि. २३ ते २५ दरम्यान ५० टक्क्यांहून अधिक, सहाव्या टप्प्यात २७ व २८ दरम्यान दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी, तर सातव्या टप्प्यात एटीकेटीसह सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकराली प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इन्फो-
प्रवेशापासून सर्व विद्यार्थी वंचित
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ प्रवेश फेरीअंतर्गत प्रवेश अर्ज भाग एक भरून प्रमाणित केलेले तसेच यापूर्वी कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले सर्व विद्यार्थी पात्र असतील. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश घेऊन ते रद्द केलेेले आहेत अथवा ज्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत, असे सर्व विद्यार्थी, यापूर्वी अथवा पुरवणी परीक्षा डिसेंबर २०२० मध्ये दहावी उत्तीर्ण असलेेले विद्यार्थी व मार्च अथवा डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत एटीकेटी सुविधा मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकरणार आहे.