नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत २ हजार १२ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच दिवशी प्रवेशाची संधी मिळालेल्या ५८४ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान, प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार (दि. ६) पर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीत ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रथम फेरीत प्रवेशाची संधी न मिळू शकल्याने दुसऱ्या फेरीत पुन्हा ऑप्शन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीनुसार प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या २०१२ विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत (दि. ६) त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून प्रक्रियेत सहभागी होता आले नाही, अथवा प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत पसंतीचे महाविद्यालय निवडून ऑप्शन फॉर्म भरले होते. अशा एकूण ९ हजार ८३८ विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीत समावेश करण्यात आला होता. त्यातील २०१२ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे तर ८९९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे तर ६७५ जणांना तिसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर, ५ हजार २०० विद्यार्थ्यांना अजूनही जागावाटप झालेले नसून या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---
आतापर्यंतची प्रवेश प्रक्रिया
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,३८०
एकूण अर्ज - २३,९७४
अर्जांची पडताळणी - २१,५३२
पर्याय निवडले - १९,६८४
प्रवेश निश्चित -९,४८०
रिक्त जागा - १५,९००