इगतपुरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेला मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. हळूहळू आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत त्वरित पोलीस प्रशासन व शाखा प्रबंधक यांना कळविल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली.शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत शाखा प्रबंधक विभागाचे दोन संगणक, सीपीयू, एक टेबल, टेबलफॅन पूर्णपणे जळाल्याची माहिती शाखा व्यवस्थापक मकरंद जोशी यांनी दिली. आग लागल्याचे पाहून जमलेल्या नागरिकांनी बँकेच्या बाहेरील काचा फोडून आत पाणी मारले.या आगीत बँकेची कागदपत्रे थोडक्यात बचावली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र बँकेचे कुठल्याही प्रकारे मोठे नुकसान झाले नसल्याचे झोनल मॅनेजर रवींद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सकाळपासून बँकेचे सर्व कामकाज सुरळीत सुरू होते. (वार्ताहर)
महाराष्ट्र बँकेच्या इगतपुरी शाखेला आग
By admin | Updated: March 9, 2017 00:47 IST