नाशिक : गेल्या शनिवारपासून शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली असली तरी रविवारी (दि.१०) मात्र दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अग्निशमन विभाग २४ तास कार्यान्वित होता. मुख्यालयासह सर्वच उपकेंद्रांच्या जवानांनी दिवस व रात्रपाळीमध्ये ‘डबल ड्यूटी’ केली. मुख्यालयासह शहरात दिवसभरात सुमारे एकूण ६१ आपत्कालीन कॉलवर भर पावसात अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्परतेने सेवा बजावली.रविवारच्या मुसळधार पावसाने अवघे जनजीवन प्रभावित झाले असताना शहरातील आपत्कालीन विभाग पूर्णत: सज्ज राहिला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी २४ तास आॅन कॉल आपत्कालीन सेवा दिली. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अनिल महाजन, राजेंद्र बैरागी, दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालयासह सर्वच उपकेंद्रांच्या जवानांनी सेवाकार्य केले. यावेळी मुख्यालयाने दिवसभरात शहरात एकूण २४ कॉलवर हजेरी लावून सेवा दिली. यामध्ये झाड, भिंत, घर, वाडे पडणे, तळमजला, वाहनतळ, इमारतींमध्ये पाणी साचणे, शॉर्टसर्किट, माणसे अडकणे अशा आपत्कालीन घटनांचा समावेश आहे. नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी, पंचवटी विभाग या उपकेंद्रांनी अनुक्रमे नऊ, दहा, सात, पाच, पाच असे कॉल घेत आपत्कालीन सेवा दिली. सर्वाधिक कॉल शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी मुख्यालयाने घेत सेवा दिली. पावसाचा जोर दिवस-रात्र कायम राहिल्यामुळे रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनाही दिवसा बोलावून घेण्यात आले होते. तसेच दिवसपाळीचे कर्मचारीही रात्री घरी न जाता कामावर हजर होते, अशी माहिती महाजन यांनी दिली.
अग्निशमन जवान २४ तास ‘आॅन ड्यूटी’
By admin | Updated: July 15, 2016 00:24 IST