सातपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मालेगाव तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला रोख १५ हजार रुपयांची मदत देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मित्र गणेशोत्सव मंडळाने यावर्षी मिरवणुकीवर पैसे खर्च न करता ते पैसे आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे जाहीर केले होते. मंडळाचे संस्थापक तुकाराम मोराडे यांनी अशा कुटुंबाचा शोध घेतला असता मालेगाव तालुक्यातील शेरूळ या गावातील लोटन सोनू बोरसे या युवा शेतकऱ्याने पीककर्जामुळे आत्महत्त्या केल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. त्यानुसार मोराडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना हुतात्मा स्मारक येथे बोलावून घेतले आणि स्वातंत्र्य सेनानी वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी नूतन, नूतनचे वडील हिलाल गजमल अहिरे व मुलगा गौरव यांना रोख पंधरा हजार रुपयांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली. यावेळी बाळासाहेब बैरागी, नागेश घोडके, किशोर लासुरे, संदीप निगळ, संजय अमृतकर आदि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
By admin | Updated: October 24, 2015 22:16 IST