घोटी : अभ्यास करण्यासाठी घराजवळील झाडाखाली बसलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात सुरुंगाचा दगड बसल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचा अखेर अंत झाला. मेंदूला मार लागल्याने कोमात गेलेल्या या मुलाने वर्षभर मृत्यूशी कडवी झुंज दिली होती. अखेर गुरुवारी या विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली. या मुलाच्या मृत्यूस सुरुंगाचा स्फोट करणारा ठेकेदार जबाबदार असल्याने त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या मुलाच्या नातलगांनी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नातवाइकाची समजूत घालीत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.मूळचा मुरंबी, ता. इगतपुरी येथील तुकाराम मते हे आपल्या कुटुंबासह गेली अनेक वर्षांपासून कोपरगाव शिवारात स्थायिक झाले आहेत. त्यांचा अमोल हा एकुलता एक मुलगा दहावीची परीक्षा देत असल्याने अभ्यासात व्यत्यय नको म्हणून घराजवळील निर्जनस्थळी अभ्यास करीत हाता. अचानक सुरुंगाचा एक दगड उडून अमोलच्या डोक्यात पडला. काही कळायच्या आत अमोल याने किंचाळी फोडली आणि तो कोसळला. आवाज ऐकून घरातील सर्वजण बाहेर आले. अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उचलून तातडीने नाशिकला उपचारार्थ हलविण्यात आले. त्या दिवसापासून अमोल नाशिक, मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी कडवी झुंज देत होता. यामुळे घरातील आर्थिक स्थिती खालविल्याने घरातही कमालीचे दारिद्र्य आले. तरीही कर्ज घेऊन, तारण ठेवून अमोलच्या उपचारासाठी मते कुटुंबाची धडपड सुरू होती. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर फक्त कागदपत्री कारवाई पोलिसांनी केली होती.
..अखेर त्या जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: July 19, 2014 20:37 IST