मालेगाव : मालेगावमधील आझादनगरमध्ये गोवंश हत्त्याबंदी कायद्याअंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दीडशे किलो मांस जप्त केले आहे. मात्र तिघे आरोपी फरार झाले आहेत. पोलीस उपअधीक्षक महेश सवई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी सायंकाळी हा छापा टाकला.येथील अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक महेश सवई व आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मसुद खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी हा छापा टाकला. छाप्यादरम्यान पथकास एका पत्र्याच्या शेडमध्ये कापलेल्या जनावरांची दोन मुंडके तसेच साधारण दीडशे किलो मांस आढळून आले. छाप्यानंतर पोलिसांनी मुंडके व मांस ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली.याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात हवालदार रविराज जगताप यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रशीद ऊर्फ पांड्या, हमीद ऊर्फ लेंडी व आसिफ तलाठी या तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (१९९५) गोवंश हत्त्याबंदी (सुधारणा) कायदा पाच- क आणि नऊ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्रात गोवंश हत्त्याबंदीचा दाखल होणारा हा पहिलाच गुन्हा आहे. सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलिस शिपाई गिरीश बागुल, संदीप राठोड यांचा समावेश होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बंटेवाड हे करत आहेत.
गोवंश हत्त्याबंदीचा पहिला गुन्हा दाखल
By admin | Updated: March 26, 2015 00:39 IST