नांदगाव : बंद पडलेली बैलगाडी शर्यत पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१२) येथील तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर संजय पवार व इतर १५ जणांवर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्चात तालुक्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या बैलगाड्या आणल्या होत्या. त्यासह काही काळासाठी रास्ता रोको आंदोलन झाल्याने ते लक्षवेधी ठरले. खिलार हा देशी गोवंश असल्याने त्यास वाचविणे ही काळाची गरज असून, देशाच्या अन्य राज्यांत अशा शर्यती असताना महाराष्ट्रात बंदी कशासाठी, असा सवाल माजी आमदार संजय पवार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात देशी गाय व बैल पूर्णपणे संपताना दिसत आहेत. ते वाचविणे काळाची गरज आहे. कोरोनाकाळात शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या शेतकऱ्याला आधार द्यावा, शेतकऱ्याला बैल व बैलजोडी खरेदीसाठी अनुदान मिळावे, २०१६-१७ च्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी. संविधान कलम ४८ प्रमाणे वन्यप्राणी यादी सरकारने जाहीर करावी, यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर माजी आमदार संजय पवार, राजेंद्र महाजन, मच्छिंद्र सातपुते, कैलास घोरपडे, पप्पू मवाळ, अनिल बर्शिले, नवनाथ लहिरे, दत्तात्रय थेटे, वाल्मीक थेटे, बाळुबा बैंडके, संदीप शेवाळे, आबासाहेब बोरसे, गोविंद बैंडके, प्रवीण पवार, संदीप पवार, तुषार शेवाळे, पवन खैरनार यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. दरम्यान, रास्ता रोको, कोविड नियमांचे व जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो- १२ नांदगाव संजय पवार
नांदगाव : तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चासमोर बोलताना माजी आमदार संजय पवार.
120821\12nsk_45_12082021_13.jpg
फोटो- १२ नांदगाव संजय पवार नांदगाव:- तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चा समोर बोलतांना माजी आमदार संजय पवार.