नाशिकरोड : लॅमरोड बेलतगव्हाण येथे पूर्ववैमनस्य व पुतणीला का छेडतो या कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लॅमरोड येथील सागर रामचंद्र गोडसे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मित्र अतुल दत्तात्रय पाळदे याला दुचाकीवर बेलतगव्हाण येथे सोडण्यास जात असताना निशांत किरण पाळदे, प्रतीक किरण पाळदे यांनी दुचाकी अडवून पूर्ववैमनस्यावरून सागर याच्या हनवटी व डोळ्याजवळ कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. बेलतगव्हाण येथील किरण दिनकर पाळदे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, पुतणीला का छेडतो म्हणून विचारणा केली असता सागर रामचंद्र गोडसे, तेजस शेळके, विजय गोडसे, जय गोडसे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. मारामारी सोडविण्यास आलेल्या पत्नी व भावालादेखील मारहाण केली. (प्रतिनिधी)
दोन गटात मारामारी; परस्पर विरोधी गुन्हे
By admin | Updated: October 5, 2015 23:38 IST