लोकमत न्यूज नेटवर्कवडझिरे : ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही नवीन योजना शासनाने आणली असून, या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली पडीक शेती सुपीक करावी, असे आवाहन जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे रविवारी सकाळी जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा शुभारंभ व पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जलसंधारणमंत्री शिंदे यांच्या हस्ते चार किलोमीटर लांबीचा नाला खोलीकरण, साखळी सीमेंट व माती बंधाऱ्यांतील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. टाटा ट्रस्ट, युवा मित्र संस्था व महाराष्ट्र शासनाच्या सहभागातून ही कामे करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा झाला असून, जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असल्याचे शिंदे यावेळी सांगितले. आत्तापर्यंत शासनाच्या योजनांमध्ये लोकांचा सहभाग असायचा; मात्र आता लोकांच्या योजनांमध्ये शासन सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. वडझिरे ग्रामपंचायतीने शासनासह टाटा ट्रस्ट व युवामित्र या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रेरणादायी कामे उभी केली असून, इतर गावांनीही याचा आदर्श घ्यायला हवा, असे गौरवोद्गार शिंदे यांनी यावेळी काढले. सार्वजनिक ठिकाणच्या जलसाठ्यांकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, गावासाठी वर्षभर लागणाऱ्या पाण्याचे ग्रामसभेत नियोजन करावे. त्यामुळे गाव सुजलाम्-सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. जलयुक्त शिवार योजना ही गावासाठी वरदान ठरणारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. वडझिरे परिसरात पावसाचे पाणी साचणार आहे. त्यामुळे गावावरील दुष्काळाचे सावट निश्चित दूर होणार आहे. वडझिरे येथे जलयुक्तच्या कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी किरण मोघे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता सी. एस. टोपले, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, उदय सांगळे, पंचायत समितीचे गटनेते संग्राम कातकाडे, संजय सानप, युवामित्रच्या मनीषा पोटे, नितीन अढांगळे, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, सरपंच संजय नागरे, अर्जुन बोडके, भीमराव दराडे, सुदाम बोडके, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, रेखा बोडके, मंदा ठोंबरे, तुषार आंबेकर, लक्ष्मण बोडके, जे. पी. बोडके, आर. बी. बोडके, विलास बोडके, अशोक बोडके, उत्तम बोडके, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी पडीक शेती सुपीक बनवावी
By admin | Updated: May 15, 2017 00:35 IST