नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांंनी शनिवारी (दि.२३) वेगवेगळ्या वाहनांमधून राजभवनाच्या दिशेने कूच केले असून हा वाहन मार्च रविवारी (दि.२४) मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर राजभवनावर धडक देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देणार असून यात परिसरात महामुक्काम आंदोलन करणार आहे.
केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरीविरोधी कृषी कायदे आणल्याचा आरोप करीत हे कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरीत्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च काढला असून, नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानातून शनिवारी (दि.२३) किसान सभेच्या नेतृत्वात जवळपास शंभर वेगवेळ्या संघटनांनी नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात केली. या वाहन मार्चमध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, जळगाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, जव्हार आदी राज्याभरातील वेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. हे सर्व शेतकरी त्यांच्या परिसरातील वाहनांमधून गोल्फ क्लब मैदानावर एकत्रित आल्यानंतर मैदानाचा परिसर लाल बावट्यांना रंगून गेला. त्याचप्रमाणे संपूर्ण मैदान लाल सलामच्या नाऱ्यांना दुमदुमून गेले. या वाहन मार्चमध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. युवक संघटना व एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेसह महाराष्ट्रभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील आहेत.
इन्फो-१
घाटनदेवी परिसरात मुक्काम
नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत इगतपुरीत घाटनदेवी येथे पोहोचणार आहे. घाटनदेवी परिसरातील मोकळ्या माळराणावरच आंदोलक मुक्कामी थांबणार असून या ठिकाणी किसान सभेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या स्वागताची तयारी केली आहे. घाटनदेवीत सायंकाळचा मुक्काम झाल्यानंतर रविवारी (दि.२४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जवळपास २० हजार शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याची माहिती किसान सभेतर्फे देण्यात आली आहे.
इन्फो-२
आझाद मैदानावर महामुक्काम सत्याग्रह
दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारीदरम्यान राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत राज्यभरातील आंदोलकांनी नाशिकमध्ये एकत्र येईल त्यांच्या वाहन जथ्थ्याने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. हा जथ्था रविवारी मुंबईत आझाद मैदान येथे दाखल होणार असून, या ठिकाणी महामुक्काम सत्याग्रहात किसान सभेचा हा वाहन मार्च २४ जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.
इन्फो-३
महाविकास आघाडीचा पाठिंबा
मुंबईत आझाद मैदानावर रविवारी संपूर्ण राज्यभरातून आंदोलक पोहोचणार असून सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. किसान सभेच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा असून या सभेला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्यासह डावे व लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत.
कोट-४
सोमवारी राजभवनकडे कूच
आझाद मैदानावर सभा झाल्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजता हजारो आंदोलक राजभवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होणार असल्याची माहिती किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिली.
इन्फो-५
आंदोलकांच्या मागण्या
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या महामुक्काम आंदोलनातून करण्यात येणार आहेत.
इन्फो-६
शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली आंदोलन
राज्यभरातील शंभरपेक्षा अधिक संघटनांतर्फे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.
इन्फो-७
हजारो आंदोलक, शेकडो वाहने
राज्यभरातून नाशिकमध्ये एकत्र आलेल्या हजारो आंदोलकांनी शेकडो वाहनांमधून मुंबईकडे कूच केले. यात सर्वप्रथम लाल वाहन व त्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या वाहनांनंतर १ ते ३० क्रमांकाच्या वाहनांनी प्रस्थान केले. त्यांतर टप्प्याने वाहने मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. यात कार, छोटा हत्ती, पिकअप, टेम्पो व ट्रकसारख्या वाहनांचा समावेश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क