सायखेडा : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने गंडा घालत दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रसवंतीसाठी फेब्रुवारी २०१५ या वर्षी ओळखीने चांदोरी येथील व्यापारी अमोल पवार याला शेतकरी राजेंद्र अहेर यांनी ११०० रु पये टनाने, दौलत हांडगे यांनी १५०० रु पये टनाने, सुनील संगमनेरे यांनी १८४१ रुपये टनाने ऊस विकला. याचप्रमाणे गावातील इतरही शेतकऱ्यांचा ऊस पवारने खरेदी केला. या उसाचे वजन चांदोरी येथे करत वजनाची पावती देण्यात आली.ऊस दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास व्यापारी पवार टाळाटाळ करू लागला अन् ऊस उत्पादकांबरोबरच खेरवाडीतील इतर शेतकऱ्यांचे पैसे न देता व्यापारी पवार घरातून पसार झाला. तो आठ दिवसांपूर्वी चांदोरी येथे आल्याचे समजल्याने सर्व शेतकरी पवारच्या घरी जात पैशांची मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना परत माघारी पाठविले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेंद्र अहेर, दौलत हांडगे, सुनील संगमनेरे यांनी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अमोल पवार याच्या विरोधात फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. यापूर्वी दिलेल्या अर्जावर शिवाजी संगमनेरे, सोमनाथ आवारे, दत्तू आवारे, रतन आवारे, विठ्ठल आवार आदि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
खेरवाडीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गंडविले
By admin | Updated: March 23, 2017 22:55 IST