मनमाड : शेतकऱ्यांनी सचोटीने वागावे तसेच लिलावाच्या वेळी पाहिजे त्या ट्रॅक्टरचे फाळके पाडू द्यावे, शेतमालात वांधे टाकू नये तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पेमेंट द्यावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संजय सांगळे होते.शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये सत्ता येताच नवीन संचालक मंडळाने जुन्या कारभारातील त्रुटी दूर करीत निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी यापुढे रोख पेमेंट मिळाल्याशिवाय व्यापाऱ्यांकडून पावतीवर पेड शिक्का मारून घेऊ नये, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांना रोजचे शेतमालाचे बाजारभाव एसएमएसद्वारे कळविण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यवेळी उपसभापती अशोक पवार, संचालक गंगाधर बिडगर, किशोर लहाने, राजू सांगळे, भागीनाथ यमगर, उत्तम व्हर्गळ, डॉ. मच्छिंद्र हाके, भाऊसाहेब जाधव, आप्पा कुणगर, दशरथ लहिरे, मीराबाई गंधाक्षे, दीपक गोगड, आनंदा मार्कंड, माणकचंद गांधी, कल्याणचंद ललवाणी, मधुकर उगले आदि संचालक उपस्थित होते. बाजार समिती सचिव पी. एस. कुलथे, निरीक्षक आर. के. कराड, आर. आर. उगले, बी. एल. गायकवाड, एन. बी. दराडे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना मिळणार रोख पेमेंट
By admin | Updated: March 20, 2016 23:21 IST