नाशिक : देश व राज्यपातळीवरील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आलेले असून, त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून विविध संघटना, संस्थांनी एकत्र येऊन किसान आझादी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून निवेदन सादर केले. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती द्या, उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा, गाव तेथे गुदाम करावे, खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, गोपालन भत्ता द्यावा, शेतकऱ्यांना जोड धंद्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज द्यावे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकर भरतीत पन्नास टक्के आरक्षण द्यावे, कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करावा, राजीव गांधी आरोग्य सेवेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा आदि अठरा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अजिज पठाण, माधुरी भदाणे, योगेश निसाळ, दीपक भदाणे, मुश्ताक शेख, इब्राहिम अत्तार, आफताब सय्यद, गौरव दाणी, मुख्तार सय्यद, ज्योती काथवटे, वंदना पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘किसान आझादी’ आंदोलन
By admin | Updated: August 10, 2016 00:33 IST