नाशिक : शहराच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ परिसरात राहणाऱ्या अनवडे या एका कुटुंबाने घरातच राहून उपचार घेत कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे दोन ज्येष्ठ नागरिक घरात असूनही हे ६ जणांचे कुटुंब घरीच उपचार घेऊन बरे झाल्यानंतर त्यांच्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील ८ जणदेखील बाधित झाले. तेदेखील घरीच उपचार घेतल्याने एकाच कुटुंबातील १४ जण कोरोनामुक्त झाले असून योग्य उपचारांनी घरी राहूनही कोरोनामुक्त होता येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
एकीकडे कोरोना झाल्याचे समजताच नागरिक प्रचंड घाबरुन थेट हॉस्पिटलची शोधाशोध करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचवेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन सर्व निर्बंध आणि उपचारांचे काटेकोर पालन केल्यास घरीच उपचार घेणेदेखील शक्य असते, हेच अनवडे यांच्या उदाहरणातून दिसून येते. संजय अनवडे यांना त्यांच्या कुटुंबात सर्वप्रथम बाधा झाली. त्यांनी नाशिकच्याच डॉ. अतुल वडगावकर यांच्याकडून उपचार घेण्यास प्रारंभ केला असतानाच त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी आणि दोन्ही मुलेदेखील बाधित झाल्याचे तपासणीतून दिसून आले. मात्र, संजय स्वत: बरे होऊ लागल्याने या सर्व बाधितांवर घरीच उपचार घेणे शक्य आहे का, याबाबत त्यांनी डॉक्टरांचाच सल्ला घेतला. त्यावर डॉक्टरांनीदेखील सर्व रुग्ण घरीच बरे होतील, असा विश्वास व्यक्त केल्याने सर्वांवर घरीच औषधोपचार केले. सर्व रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. डॉ. वडगावकर यांनी तर ज्या रुग्णांना घरीच राहून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर उपचार करता येणार आहेत, त्यांना घरीच कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यास सुरुवात केल्याने त्यांच्याकडील सर्वच रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याचे अनवडे यांनी नमूद केले.
-------------------
इन्फो
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा प्रचंड वेग पाहता जे रुग्ण गंभीर नाहीत, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांनी घरीच राहून उपचार घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा जे गंभीर नाहीत, असे अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड अडवून बसले असल्याने गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोट
मी बाधित झाल्यानंतर प्रचंड घाबरलो होतो. माझ्याकडे मेडीक्लेम असल्याने सरांना मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ का, अशीदेखील विचारणा केली. मात्र, सरांनी ॲडमिट न होतादेखील बरे होऊ शकाल, असा विश्वास दिल्यामुळेच घरी राहून उपचार करण्याचा निर्णय घेतला.
संजय अनवडे
----------------
आमच्या मुलानेच डॉक्टरांशी बोलून घरातच वेगळ्या खोलीत राहून उपचार केले. डॉक्टरांचे चांगले उपचार तसेच मुलाने आणि सुनेने चांगली काळजी घेतल्याने घरी राहूनदेखील आम्ही बरे झालो. आता आम्ही अगदी पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त झालो असून आजारपणाने कोणतेही नुकसान झाले नाही.
बाबुलाल अनवडे
-------------------
(ही डमी आहे. )