येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याची दुपटीने आवक झाली असून, आवकेत वाढच होत आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोन लाख ९० हजार ९५० क्विंटल एवढी आवक होऊन १०५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला होता. यंदा २० जानेवारी २०१७ पर्यंत ४ लाख ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून, ५२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा कवडीमोल भाव मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात २०० रु पये घसरण झाल्याने सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही असे बुरे दिन शेतकऱ्यांवर आल्याची प्रतिक्रिया बाजार समितीच्या आवारात शनिवारी व्यक्त होत होती. राज्यासह देशांतर्गत व परदेशातही कांद्याचे उत्पादन वाढल्याने शनिवारपासून आवकेत वाढ होत असल्याने भाव आणखी घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. एकीकडे आवक वाढत असताना निर्यातवाढीला चालना द्यावी, निर्यातदारांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. निर्यात वाढली तर निदान सध्या कांद्याला आलेली अवकळा थांबेल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती औजारे व मजुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने एकरी उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कांदा उत्पादनासाठी आलेला खर्च, सरकारी, निमसरकारी संस्थाकडून तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.
कांदा भावात घसरण सुरूच
By admin | Updated: January 21, 2017 22:53 IST