नाशिक : शहरातील सर्वाधिक गर्दी असलेल्या मेळा बसस्थानकाचा आता कायापालट होणार असून, या स्थानकाचे बसपोर्टमध्ये रूपांतर होणार आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने संकल्पचित्र तयार केले असून, बसस्थानकावर विमानतळाची अनुभूती प्रवाशांना मिळणार आहे. शहरात सीबीएस म्हणजेच ठक्कर बाजार आणि मेळा बसस्थानकावर अधिक गर्दी असते. दिवसभरात हजारो भाविक या बसस्थानकात येत असतात. मात्र मेळा बसस्थानक अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही की तेथील समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींमुळे या बसस्थानकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुनगंट्टीवार यांनी राज्यातील पाच बसस्थानके अद्ययावत करण्यासाठी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यात नाशिकच्या मेळा बसस्थानकासाठी चार कोटी व महामार्ग बसस्थानकासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तथापि, बसस्थानकाचे बसपोर्टमध्ये रूपांतर करण्यासाठी चांगल्या वास्तुविशारदाकडून संकल्पना चित्र आणि आराखडा तयार करून घ्यावी, त्यासाठी जादा निधी मंजूर करण्याची मागणी होती. त्यानुसार परिवहन महामंडळाने खासगी आर्किटेक्ट नियुक्त करण्याची कार्यवाही केली आणि पुणे येथील प्रशांत कुलकर्णी यांच्याकडून बसपोर्टचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. आता विमानतळाच्या धर्तीवर हा बसपोर्ट तयार होणार असून १४ कोटी रुपये खर्च होणार आहे. (प्रतिनिधी)
मेळा स्थानकाचा होणार बसपोर्ट
By admin | Updated: November 15, 2016 02:27 IST