नाशिक : महापालिकेने डास निर्मूलनासाठी दोन महिन्यांपूर्वीच नव्याने दिलेला पेस्ट कंट्रोलचा ठेका अडचणीत सापडण्याची चिन्हे असून, डेंग्यू रोखण्यात अपयश आल्याने आरोग्य विभागाने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देतानाच कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत पेस्ट कंट्रोलचा ठेका गाजतो आहे. यापूर्वीच्या ठेकेदाराबाबत प्रचंड तक्रारींमुळे महापालिकेने नव्याने निविदाप्रक्रिया राबविली होती. सदर प्रक्रियेत पेस्ट कंट्रोलचा २० कोटी रुपयांचा ठेका तीन वर्षांसाठी सिडकोतील मे. दिग्विजय एंटरप्रायझेस यांना देण्याबाबतही विरोध झाला. प्रकरण न्यायप्रवीष्ट होऊन न्यायालयानेच अखेर आयुक्तांना अधिकार देत ठेका देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, दि. ८ आॅगस्ट २०१६ पासून शहरात मे. दिग्विजय एंटरप्रायझेस या कंपनीमार्फत पेस्ट कंट्रोलचे काम केले जात आहे. मात्र, ठेका दिल्यापासून दोन महिन्यांत शहरात डेंग्यू आणि अन्य कीटकजन्य आजार कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. डेंग्यू रोखण्यात ठेकेदाराला अपयश आल्याने अखेर महापालिकेने ठेकेदाराला असमाधानकारक कामाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली असून, येत्या तीन दिवसांत खुलासा मागविला आहे. याशिवाय, कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्याचा इशाराही आरोग्य विभागाने नोटिसीत दिला आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यू रोखण्यात अपयश, ठेकेदाराला नोटीस
By admin | Updated: September 30, 2016 02:05 IST